लवकरच येणार हायपरलूप
लवकरच येणार हायपरलूप
मुंबई-दिल्ली अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ निम्म्याने घटणार
मुंबई-दिल्ली आणि मुंबई-चेन्नई प्रवासासाठी लागणारा वेळ निम्म्याने कमी करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच पाऊल उचलणार आहे. यासोबतच चेन्नई-बंगळुरु आणि बंगळुरु-थिरुअनंतपुरम यांच्या दरम्यानच्या प्रवासासाठी लागणारा वेळदेखील निम्म्याने कमी होणार आहे.
केंद्र सरकार लवकरच हायपरलूप तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याने प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत बचत होणार आहे. हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित प्रवासाला सुरुवात झाल्यास चेन्नई-बंगळुरु प्रवासासाठी १ तासाऐवजी अवघी २० मिनिटे लागतील. तर बंगळुरु-थिरुअनंतपुरम हे अंतर कापण्यासाठी ७० मिनिटांऐवजी ३० मिनिटे लागणार आहेत.
‘हायपरलूपच्या माध्यमातून १,०८० किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास शक्य आहे. हायपरलूपची क्षमता ट्रेनसारखी असली तरी हायपरलूपमधील सोयीसुविधा मेट्रोसारख्या असतात,’ अशी माहिती हायपरलूप वनचे उपाध्यक्ष ऍलन जेम्स यांनी दिली आहे. भारतात पाच मार्गांवर हायपरलूप तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रवासी मार्ग सुरू केला जाणार आहे. याबद्दलची शासकीय प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये हायपरलूप तंत्रज्ञान भारतात आणले जाणार आहे.
‘हायपलूप तंत्रज्ञानातून देशातील शहरांना जोडण्यासाठी संबंधित राज्यांची परवानगी घेण्यात येणार आहे. याविषयी रस्ते वाहतूक मंत्रालयाशी चर्चा करायची आहे. यानंतर आम्ही सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊ,’ असे हायपरलूपचे उपाध्यक्ष ऍलन जेम्स यांनी म्हटले आहे. हायपरलूप तंत्रज्ञानावर काम करणारी हायपरलूप वन ही सध्या जगातील एकमेव कंपनी आहे.
काय आहे हायपरलूप तंत्रज्ञान ?
हायपरलूप तंत्रज्ञानामध्ये हवेच्या निर्वात पोकळीतून गतिरोधाशिवाय विशिष्ट वाहनातून प्रवासी किंवा सामानाची ने – आण करणे शक्य होते. यासाठी विशिष्ट प्रकारच्या ट्यूबची (बोगदा) निर्मिती करावी लागते. या ट्यूबमध्ये कॅप्सूलच्या आकाराचे डबे असतात. हे डबे ट्यूबमधील चुंबकीय तंत्रज्ञान असलेल्या रुळांवरुन धावतील. ट्यूबमध्ये हवे प्रतिरोध नसल्याने आणि चुंबकीय तंत्रज्ञानामुळे हे डबे विमानाच्या वेगाने धावू शकतात. एका डब्यामधून २८ ते ३० प्रवासी प्रवास करु शकतात. ३० सेकंदानंतर प्रत्येक कॅप्सूल सोडता येईल असा दावा कंपनीच्या अधिका-यांनी केला आहे. हायपरलूप ट्रेनचा वेग हा ध्वनीच्या वेगाइतका असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे हायपरलूप कंपनीने भारतात हा प्रकल्प राबवण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.
हायपरलूपसाठी येणारा खर्च ?
बुलेट ट्रेनसाठी प्रति किलोमीटर २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर हायपरलूपसाठी प्रति किलोमीटर २६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पण बुलेट ट्रेनपेक्षा हायपरलूप ट्रेनच्या देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च खूप कमी आहे.