" राष्ट्रीय विज्ञान दिन "
" राष्ट्रीय विज्ञान दिन "
*२८ फेब्रुवारी १९२८ रोजी नोबेल पारितोषिक विजेते - भारतरत्न सर डाँ.सी. व्ही. रामन यांनी *'रामन इफेक्ट' हा वैशिष्ट्यपूर्ण शोधनिबंध जगासमोर सादर केला होता. त्या दिवसाचे औचित्य साधून हा दिवस *'राष्ट्रीय विज्ञान दिन'* म्हणून साजरा केला जातो. भारतासाठी पहिले नोबेल पारितोषिक मिळवून देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ-संशोधक म्हणजे भारतरत्न सर - चंदशेखर व्यंकट रामन !
*२८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी सर सी. व्ही. रामन ह्यांनी हा शोधनिबंध जगासमोर मांडला आणि त्याला १९३०मध्ये मान्यता मिळून, भौतिकशास्त्राचा अत्यंत मानाचा नोबेल पुरस्कार त्यांना १९३०मध्ये प्राप्त झाला.*
आज एकविसाव्या शतकातील पहिले दशक उलटून गेले असताना जगातल्या पुढारलेल्या देशांप्रमाणेच भारतातही सर्व आधुनिक गोष्टी वापरात आल्या आहेत.
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या विविध योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे. राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी कोणती तारीख निवडावी यासाठी तेव्हा खूप मोठा खल झाला. २ ऑक्टोबर ही गांधी जयंती घ्यावी की १४ नोव्हेंबर ही नेहरू जयंती घ्यावी असा एकूण चर्चेचा सूर असताना एकदम डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की अरे ! हा तर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी दिवस शोधायचा आहे आणि भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध *‘नेचर’* या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये ? अखेर ती तारीख निघाली २८ फेब्रुवारी व तीच मुक्रर झाली. तोच हा राष्ट्रीय विज्ञान दिन.
का हे विज्ञानाचे वातावरण निर्माण करायचे ? जगातल्या
पुढारलेल्या देशांना त्याची गरज भासत नाही कारण तेथे अंधश्रद्धा नाहीत असे नाही पण त्या कमी मात्र नक्कीच आहेत. तेथील लोक कार्यकारणभाव समजावून घेणारे दिसतात. पण भारतात ती परिस्थिती नाही.
*‘वैज्ञानिक दृष्टिकोन’* हा तात्त्विक, तर्कशुद्ध विचारांच्या कारणमीमांसेवर आधारित असतो. तो अर्थाअर्थी शिक्षण आणि विज्ञानावर अवलंबून नसतो. आपल्याकडील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, महात्मा जोतीबा फुले, संत गाडगेबाबा असे अनेक थोर भारतीय विचारवंत वैज्ञानिक दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते होते. ‘विज्ञानवाही अर्थात सखोल विचार चिंतनासाठी विज्ञान शिक्षणच हवं असं नाही. फक्त विज्ञान शिक्षणामुळे गणिती सूत्रांचं आकलन होऊ शकतं. मात्र, वैज्ञानिक-तात्त्विक विचार बैठकीमुळे अंधश्रद्धांचे ढग आपले आपणच स्वत:हून बाजूला काढू शकतो आणि म्हणूनच *विज्ञानाची व्याख्या म्हणजे एखाद्या गोष्टीचा शास्त्रशुद्ध- सर्वागीण सखोल अभ्यास करून विशेष ज्ञान मिळवणं, अशी करता येते.* अर्थात विज्ञान हे यंत्र आहे, विचारांचे उपकरण आहे. आपल्याला कुतूहलापोटी, जिज्ञासेपोटी वाटणारी प्रत्येक गोष्ट या वैचारिक-तार्किक यंत्रात घालून याबद्दलची माहिती-ओळख आपण मिळवू शकतो.