साखरेचे उत्पादन मागील हंगामापेक्षा कमी

साखरेचे उत्पादन मागील हंगामापेक्षा कमी

'आयएसएमए'चा सुधारित अंदाज जाहीर; महाराष्ट्र, कर्नाटकात सर्वाधिक फटका

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (आयएसएमए) या हंगामात देशातील साखर उत्पादनाचा अंदाज 9 टक्क्यांनी कमी करून 21.3 दशलक्ष टनांवर आणला आहे. याला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील उत्पादनातील घट कारणीभूत ठरली आहे.
"आयएसएमए'ने जाहीर केलेल्या पहिल्या अंदाजानुसार, देशात 2016-17 या हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) साखरेचे उत्पादन 23.4 दशलक्ष टन अपेक्षित होते.

मागील हंगामात ते 25.1 दशलक्ष टन होते. सरकारने या हंगामात साखरेचे उत्पादन 22.5 दशलक्ष टन राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. "आयएसएमए'ने जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार, या हंगामात साखरेचे उत्पादन 21.3 दशलक्ष टन राहील. "आयएसएमए'ची बैठक आज दिल्लीत झाली. या बैठकीनंतर हा अंदाज जाहीर करण्यात आला. साखरेचे उत्पादन कमी होण्याला उसाचे हेक्टरी कमी झालेले उत्पादन, साखर कारखान्यांचे मंदावलेले गळीत हंगाम, घसरलेला साखर उतारा आणि पाण्याची कमी झालेली उपलब्धता हे घटक कारणीभूत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

महाराष्ट्र व कर्नाटकातील दुष्काळी भागातील काही साखर कारखान्यांनी गळीत हंगाम बंद केले आहेत. उसाचा पुरवठा अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार, या वर्षी 15 जानेवारीपर्यंत साखरेचे उत्पादन 10.48 दशलक्ष टन झाले आहे. यात मागील हंगामाच्या तुलनेत 5 टक्के घट झाली आहे. आता दुष्काळी भागातील साखर कारखाने गळीत हंगाम बंद करू लागल्याने ही घट आणखी वाढणार आहे.

उत्तर प्रदेशात चांगले उत्पादन

उत्तर प्रदेशात या वर्षी उसाचे उत्पादन अपेक्षेपक्षा चांगले आहे. यामुळे राज्यातील साखर उत्पादनात आधीच्या अंदाजापेक्षा काही प्रमाणात वाढ होणार आहे. उसाच्या "को0238' या वाणाची लागवड वाढल्याने उत्पादन आणि साखर उताराही वाढल्याने गेल्या हंगामापेक्षा या हंगामात साखरेचे उत्पादन राज्यात अधिक होण्याची शक्यता आहे.

Popular posts from this blog

चुंबकाचे गुणधर्म

खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे

भारतातील सर्वात मोठे